"शाहू महाराज ब्राम्हणांचे शत्रू होते का?" (भाग -२) संस्थानातील महाराजांचे खासगी कारभारी‚संस्थानचे मुख्य पोलीस अधिकारी‚मुख्य न्यायाधीश‚दुय्यम न्यायाधीश‚शिक्षण खात्याचे संचालक‚स्त्रीशिक्षणाधिकारी‚तंत्रशाळेचे प्रमुख‚जेलर‚स्टेट प्लीडर‚दरबार सर्जन आदी अनेक पदांवर ब्राह्मणच होते


कोल्हापूर-इंदूर संस्थानांच्या दरम्यान १०० आंतरजातीय विवाह घडवून आणण्याचे काम ज्या पिशविकरांवर महाराजांनी सोपवलेले होते तेही ब्राम्हणच होते.


तोफखाने मास्तर तर शाहू महाराजांच्या खास प्रीतीमधील होते. त्यांच्या शाळेला जागा देण्यास खासगी कारभाऱ्यांनी विलंब केला‚ तेव्हा खुद्द महाराजांनी पुढाकार घेऊन‚ सहा तास उन्हात उभे राहून‚ ती जागा तोफखान्यांना खुली करून दिली होती. .


"तोफखान्यांची" स्वामीनिष्ठा‚ शिक्षणप्रेम‚ प्रामाणिकपणा‚ सौजन्य‚ स्वार्थत्यागवृत्ती इत्यादी गुणांनी महाराजांना मोहीत केले होते. त्यांच्या निरपेक्ष स्वभावामुळे त्यांना कर्ज झाल्याचे समजताच महाराजांनी एक हुकूम काढला. तो असा −


‘रा. तोफखाने हे आमचे असल्यामुळे व यांनी लोकांची कसबाकसबी केली नसल्यामुळे त्यांना ३००० रुपये देणगी खाते द्यावेत. गोखले मास्तर व करमरकर मास्तर यांचे प्रमाणे यांना आमची काळजी आहे. सबब त्यांना कर्जात ठेवणे योग्य होणार नाही. तरी त्यांना तीन हजार रुपये आदा करावेत - शाहू छत्रपती’


महायुद्धाच्या काळात कच्च्या लोखंडाभावी कारखाना बंद पडण्याचे संकट निर्माण झाले असता लक्ष्मणराव किर्लोस्करांना संस्थानातील जुन्या तोफा पुरवून महाराजांनीच तो कारखाना तगवून धरला होता.


१९१८ मध्ये सरसुभे यांच्या नावे महाराजांनी काढलेला एक हुकूम पाहा −


‘तलाठ्यांच्या नेमणुका होत आहेत. त्यात ब्राह्मण लोकांस घेतले जात नाही‚ अशी तक्रार आली आहे. सरकारी नोकरीस अमुक जातीचे लोक लायक नाहीत किंवा घेण्याचे नाहीत‚ असे ठरविणे योग्य नाही. सर्वांस ती मोकळी पाहिजे. समजून तजवीज राहावी− शाहू छत्रपती.’


संस्थानच्या पागेत दोन ब्राह्मण व्यक्ती ‘शिलेदार’ म्हणून नोकरीस होत्या. नोकरीच्या जागी त्यांची होणारी कुचंबणा महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी उदार मनाने हुकूम काढला : ‘शिलेदार मोरेश्वर विठ्ठल श्रीखंडे व अनंत दत्तात्रय पडळकर हे ब्राह्मण आहेत. त्यांना राकट काम करावे लागते.


त्यांना घोड्याची मालीस करणे‚ लीद-मूत काढणे‚ वेळ पडल्यास शिकार-मांस वाहून नेणे वाईट वाटते. इतर शिलेदार मराठे व मुसलमान असल्याने यांच्या जेवणा-खाण्याचीही सोय या लोकात होत नाही. म्हणून त्यांची नोकरी व उत्पन्ने शिलेदार लिष्टातून कमी करून कारकुनी लिष्टात घालण्यात येत आहेत.’


संस्थानात नोकरीस असणारा ब्राम्हण सखाराम बाजी कुलकर्णी हा नोकर प्लेगाच्या साथीत अकाली मृत्यू पावला.तेव्हा त्याच्या पत्नीने‚‘आपल्यावर अकाली घाला आल्याने अगदी निराधार झाले आहे पोटी दोन मुलगे असून त्यांचे संरक्षण होण्यास काही सोय नाही.भ्रतारांनी मूळ सरकारचे आश्रयानेच विद्या केली असून


नोकरी १४-१५ वर्षे इमाने इतबारे केली. या सर्व गोष्टी ध्यानी आणून पोटाची सोय व्हावी‚’ म्हणून महाराजांकडे अर्ज केला. तेव्हा महाराजांनी कृपाळू होऊन तिला दरमहा चार रुपये व मुलांना प्रत्येकी तीन रुपये याप्रमाणे एकूण दहा रुपयांची पोटगी त्या कुटुंबास सुरू केली.


मल्हार बळवंत गर्दे यांच्या निधनानंतर त्यांचे सहा व्यक्तींचे कुटुंब निराश्रित झाले. मुलगा पुण्यास फर्ग्युसन कॉलेजात शिकत होता. घरी दोन मुली लग्नाच्या होत्या. या परिस्थितीत कुटुंबाचा चरितार्थ चालणे कठीण झाले. तेव्हा उपरोक्त वकिलांनी निरपेक्ष बुद्धीने सरकारची सेवा केली आहे‚


हे ध्यानी आणून शाहू महाराजांनी वकिलांच्या पत्नीस हयात असेतो दरमहा दहा रुपये व मुलास पाच वर्षांपर्यंत शिक्षणासाठी दरमहा तीस रुपये असे एकूण चाळीस रुपये मंजूर केले. त्या वेळी शिक्षकाचा पगार साधारणपणे दहा-बारा रुपये होता. यावरून ही रक्कम किती मोठी होती हे लक्षात येईल.


अशी अनेक उदाहरणे महाराजांच्या जाहीरनाम्यात आणि हुकूमनाम्यात सापडतील. महाराज कधीही ब्राम्हणांचे विरोधक नव्हते. कुलकर्णी वतन रद्द करण्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला तेव्हा महाराज ब्राम्हण द्वेशी आहेत असे चित्र रंगवले गेले मात्र याच परिस्थितीत कोल्हापूर संस्थानातील एका


ब्राह्मण कुलकर्ण्यांच्या घराण्यावर शाहू महाराजांनी आपल्या कृपेचे व मायेचे छत्र कसे धरले होते‚ याची साक्ष आजही कोल्हापुरातील सांगवडेकर कुलकर्णी यांच्या घराण्यातील प्रमुख दादा महाराज व त्यांचे बंधू देतात. आजही हे सांगवडेकर घराणे शाहू महाराजांना आपले दैवत मानते.


ब्राम्हण ब्युरॉक्रसीशी लढताना महाराजांनी कधीही ब्राम्हण द्वेष केला नाही. आपण स्वतः मराठा आहोत पण आपली प्रजा अनेक जाती धर्माचे मिळून बनली आहे हा राजधर्म ते जाणून होते. त्यामुळेच त्यांनी कधीही एका धर्माच्या किंवा जातीच्या विरोधात कोणतेही कृत्य केल्याचे इतिहासात सापडत नाही.


पण सर्व जाती धर्माला केलेली मदत. सर्व जाती धर्म एकत्र यावेत यासाठी केलेले प्रयत्न आजही अमर आहेत.


म्हणूनच ब्राह्मण वर्गातील राजारामशास्त्री भागवतांसारखे प्रकांड पंडित‚ सांगलीचे नामवंत वकील गणेश रघुनाथ अभ्यंकर यांच्यासारखे प्रसिद्ध बुद्धिवंत‚ कुरुंदवाडचे बाळासाहेब पटवर्धनांसारखे उदारमनस्क जहागीरदार अशा अनेक नामवंत व्यक्ती त्यांच्यावर प्रेम करताना आढळतात... क्रमशः


संदर्भ :- १. कित्ता २. राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ‚पृ.२९८ ३. राजर्षी शाहू छत्रपतींचे निवडक आदेश‚भाग-२‚पृ.१०८ ४. राजर्षी शाहू छत्रपती‚पृ.२६९ ५. राजर्षी शाहू छत्रपतीचे निवडक आदेश‚भाग-२‚पृ.२० ६. कित्ता‚पृ.८१-८२, भाग-१‚पृ.३४-३५ ७. कित्ता‚पृ.१७३ ८. राजर्षी शाहू महाराज एक मागोवा.



Top