#थ्रेड #आई "न रें द्रा..." अस्पष्टसं.. अस्फुटसं.. ती वृद्ध माऊली पुटपुटली.. "आलास.. ना.. रे.. तू..? आलासच ना रे तू.. शेवटी.." बोलताना त्रास होत होता पण ती बोलण्याचा कसोशीने प्रयत्न करत होती.. नरेंद्र तिच्या शेजारी बसला.. त्याचा हात तिने तिच्या सुरकुतलेल्या (१/१२)


हातात घेतला आणि थोडासा दाबला. भावनावेगाने कितीही स्वाभाविक दाब नरेन्द्राच्या हातावर पडला तरी त्याच्यासाठी तो कापसासारखाच हलका.. ह्याची जाणीव होऊन ती माऊली मनाशीच हसली.. "किती म्हातारा दिसतोय तू?" "किती स्पष्ट दिसतंय मला आज.." "डोळ्याला चष्मा नसूनही?" थरथरणारे हात (२/१२)


स्वतःच्या डोळ्याला लावत ती माउली पुटपुटली.. "पुन्हा भास.. पुन्हा भास.. पुन्हा भास.. सतत भास.. तू नसतानाचे भास.. माझ्या पाचवीलाच पुजलेले.. तू लहान होतास. संघाचं वेड लागलं आणि तुझ्या दुसर्या आईचं अस्तित्व तुला जास्त खुणावू लागलं. तुझी ओढ तिकडं जास्त होती. (३/१२)


तेंव्हापासून तुझं बाहेर जास्त आणि घरी कमी येणं होत असे.. नरेन्द्रा.. तेंव्हापासूनच हे भास.. तुझ्या असण्याचे.. तू नसतानाचे" खोकल्याची उबळ त्या माउलीला आली.. तोंडात दोन चार थेंब टाकले गेले.. "लोकं तुला नशीबवान म्हणत असतील.. पण खरी नशीबवान मीच अरे.. मुलगा एवढ्या (४/१२)


उच्च पातळीवर गेला हे बघायला माझे डोळे, माझे कान भगवंताने शाबूत ठेवले.. कोणत्या आईला हे भाग्य मिळालंय सांग पाहू, नरेन्द्रा?" "नंतर सवय झाली पण सुरुवातीला मोदींची आई म्हणून लोकं माझा उल्लेख करायचे तेंव्हा मूठ मूठ मांस दर क्षणी वाढत असे बघ.. मोजायला हवं होतं का रे ते?" (५/१२)


"आहेस ना रे?" म्हणून तिने नरेंद्रचा हात दाबून चाचपडण्याचा क्षीण प्रयत्न केला.. " एकदा तू मला दिल्लीला घेऊन गेला होतास, पंतप्रधान झाल्यावर.. तसा प्रकाश मला आत्ता दिसतोय.. दिव्य प्रकाश.. तू थकतोस, दमतोस, पण दाखवत नाहीस. तुझी ती खोड मी चांगलीच जाणून आहे. लहान (६/१२)


असताना मगरीच पिल्लू आणलं होतंस घरी. तेंव्हापासून तुझी आणि मगरीची गट्टीच जमली जणू. नंतर कितीवेळा तिने तुला मिठीत घ्यायचा प्रयत्न केला असेल रे? दरवेळेस तिला मात दिलीस. पण आणीबाणीच्या वेळेस भूमीगत होतास ते नाव बदलून, तेंव्हा खूप काळजी होती. तेंव्हा "हे" (७/१२)


सोबत होते. पण मुख्यमंत्री झाल्यास जे काही घडलं ते भोगून कधीही धायमोकलून रडला नाहीस. तेंव्हा तर "हे" सुद्धा नव्हते सोबत. काळीज मुठीत ठेवून बातम्या ऐकत, वाचत असे मी. डोळा लागत नसे. डोळा लागला आणि काही अघटित घडलं तर? ठोका चुकण्याची वाट, इच्छा नसून बघितली जायची खरंच (८/१२)


रडला नाहीस? खरंच? आपण हे असं कधी बोललोय का रे? एवढा वेळ कधी मिळाला का रे आपल्याला? तू एवढा निवांत कसा दिसतोयेस आज? अरे हां.. भास.." "आई दमलोय गं" म्हणत लहानपणी कुशीत यायचास. नंतर सर्वार्थाने मोठा झालास. मोठ्यांना वैयक्तिक आयुष्य नसतं. माझी कुशी तुझी वाट पहात असायची. (९/१२)


तुला भारतमातेची कुशी जास्त आवडते. नरेन्द्रा.. यशोदेला तरी कृष्णाचा सहवास तो किती मिळाला रे? कृष्ण मोठा झाला की देवकीकडे गेलाच की. म्ह्णून यशोदा दुर्दैवी होते का रे? ... कृष्णाचा सहवास तिला आजन्म पुरला असेल. मी तरी काही वेगळी आहे का? माझ्यापेक्षा भारतमातेला तुझी जास्त (१०/१२)


गरज. तिकडेच तू हवा. इथं इतर मुलं आहेतच की.. माझ्या कृष्णा.. खरं सांग.. "दमायचास ना रे?" आता मला दम लागतोय खरा.. पण स्वतःच्या मुलाला म्हातारं झालेलं भाग्य मला लाभलं. खरं सांगू? तुझं नाव ठेवताना एवढा थोर विचार नव्हता रे.. ना माझा ना ह्यांचा.. त्या भगवंताचे किती (११/१२)


आभार मानू? काही नाही राहिलं. अनपेक्षितपणे खूप काही भव्य माप भगवंतानं पदरात दिलंस.. आता पुढचा प्रवास प्रकाश लख्ख होतोय अजून.. ह्यांना सगळं सांगेन वर जाऊन.. त्यांनी तरी किती अजून माझी वाट पहायची? हलकं हलकं वाटतंय.. हलकं हलकं.. एकदम हलकं हलकं.." जय श्रीराम - चेतन दीक्षित(१२/१२)


Top